गणित सर्वव्यापी आहे. कळत नकळत रोजच्या आयुष्यात आपण गणिताचा वापर सतत करीत असतो. आपण फोन वापरतो. इंटरनेट वापरतो. पैश्यांचे व्यवहार सांभाळतो. व्यवसायात किती जोखीम घ्यायची ते ठरवतो. हवामानाचा अंदाज पाहतो. अगदी स्वैंपाक करतांना किंवा प्रवास करतांनाही गणिताचा वापर होतच असतो.

गेल्या २० वर्षातील विज्ञानाच्या प्रगतीमुळे गणिताचे महत्व खूपच वाढले आहे. काही नवीन व्यवसायांसाठी आणि आपल्या दैनंदिन व्यवहारात सुध्दा गणिताची गरज वाढली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना गणिती साक्षर बनविणे हे देशापुढील प्रमुख आव्हान बनले आहे. आताच्या गणितीसाक्षरतेत केवळ आकडेमोड करता येणे पुरेसे नाही. तर नागरिकांना गणितातील मूलभूत पण अद्ययावत ज्ञान व कौशल्ये ज्ञात असणे आवश्यक आहे. गणितामुळे तर्कशुद्ध विचार करुन समस्येचे निराकरण करण्याची क्षमता विकसित होते. म्हणून आजच्या गुंतागुतीच्या आयुष्यात तर्कशुद्ध विचारसरणी लहान वयातच रुजवणे गरजेचे आहे. परंतु एवढा महत्वाचा  विषय असूनही तो खूप जणांना आवडत नाही किंवा जमत नाही. या विषयाची नावड कुठेतरी लहानपणीच्या शिकण्यातच दडली आहे. विद्यार्थ्याच्या मनात गणिताची भिती दूर करुन त्याची आवड निर्माण करणे हे आमच्या संस्थेचे प्रमुख उद्दीष्ट आहे. तेंव्हा पालक,शिक्षक यांना आम्ही आवाहन करतो की पुढील पिढयांमधे या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा.